औरंगाबाद- गेल्या चार
वर्षांपासून राजकारणापासून दूर राहिलेले राज्याचे माजी शालेय शिक्षणमंत्री तथा
लोकमतचे एडीटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांनी रविवारी शहरातील सर्व जाती- धर्मातील
सामाजिक व राजकीय नेते आजी-माजी आमदार, नगरसेवकांना स्नेह-भोजनाच्या निमित्ताने
एकत्रित करीत संवाद साधल्याने दर्डा यांचे राजकारणातील पुनरागमन निश्चित झाले
आहे.
राजेंद्र दर्डा यांनी १९९५ च्या विधानसभा
निवडणुकीत काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळविली. पण या निवडणुकीत त्यांना अपयश आले
होते. त्यानंतर १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत ते विजयी झाले आणि राज्याच्या
मंत्रिमंडळात राज्यमंत्री झाले. सलग १५ वर्ष ते आमदार म्हणून निवडून आले आणि
नंतरच्या दहा वर्षांत मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्री म्हणून काम पाहिले.पण २०१४ मध्ये
झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मोदी लाट आणि एमआयएमच्या हवेत राजेंद्र दर्डा हे
मोठ्या फरकाने पराजित झाले. निवडणुकीतील पराभव त्यांच्या एवढा जिव्हारी लागला की,
त्यांनी
पराभवानंतर काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला जाणे बंद केले. एवढेच नव्हे
तर त्यांच्या नावापुढे माजी मंत्री लावण्याऐवजी एडिटर इन चिफ लिहिणे सुरू केले.
गेली चार वर्ष ते राजकारणापासून अलिप्त
होते. पण नुकताच त्यांचा वाढदिवस २१ नोव्हेंबर रोजी साजरा झाला. वाढदिवसाच्या
निमित्ताने शहरात जी होर्डिंग्ज लावण्यात आले होते. त्यावेळेसच ते पुन्हा
राजकारणात सक्रीय होणार असल्याचे सूचित झाले होते. रविवार दि. ९ डिसेंबर
रोजी दर्डा यांनी शहरातील तीनही मतदारसंघातील काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस,
रिपाइंच्या
विविध गटातील कार्यकर्त्यांसह मुस्लिम पक्ष संघटनांतील कार्यकर्त्यांना
स्नेहभोजनाच्या निमित्ताने प्रेसिडेंट लॉन येथे एकत्रित बोलावले. यावेळी त्यांनी
सर्व जाती- धर्मातील कार्यकर्त्यांना एकत्रित करीत सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न
केला. तसेच त्यांच्याशी मन मोकळे पणाने संवाद साधला.
दर्डा यांचा लोकमतच्या माध्यमातून तसेच गेली १५
वर्ष आमदार व मंत्री राहिल्याने जिल्ह्यात व शहरात मोठा जनसंपर्क आहे. या
जनसंपर्काचा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला निश्चितच
फायदा होणार आहे. रविवारी झालेल्या स्नेहभोजनात अनेक कार्यकर्त्यांनी ही
बाबूजींच्या राजकीय सक्रीयतेबद्दल आनंद व्यक्त केला.